सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. आता हेच पाहा ना… गेल्या काही दिवसांपासून मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियनरचीच चर्चा आहे. अगदी काल- परवापर्यंत ही प्रिया वारियनर कोण असा जर तुम्हाला प्रश्न विचारला असतं तर तुम्हालाही त्याचं उत्तर देता आलं नसतं. पण आता ती कोण आहे हे संपूर्ण भारताला माहित आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने तिच्या सिनेमातील एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती डोळ्यांच्या हावभावातून आपलं प्रेम सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ ‘उरू अदार लव्ह’ या आगामी सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ गाण्यातील आहे. गाण्यातील एका दृश्यात प्रिया तिच्या शाळकरी प्रियकराला डोळ्यांच्या हावभावातून तिच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करत आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला काही दिवसच उरले असताना या दिनानिमित्त हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘उरू अदार लव्ह’ हा प्रियाचा पहिलाच सिनेमा आहे. येत्या ३ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews